आमचा नगरसेवक

By MAHESH BHUWAD - April 03, 2019


जनमत पक्ष

जनमत पक्ष


नमस्कार ! ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. बातमी आहे निवडणुकीच्या रणधुमाळीची. अवघे दोन दिवस राहिलेत असून प्रचाराचा जोर आणि कार्यकर्त्याचा उत्साह शिगेला पोहचला आहे. घरोघरी मतदारांच्या भेटी घेऊन आपल्या सामाजिक कार्याची माहितीचा तपशील देत कार्यकर्त्यानी "कोण म्हणत येणार नाय आल्याशिवाय राहणार नाय" चा नारा देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उमदेवार आणि पक्ष कार्यकर्त्यांनी केला आहे या सविस्तर बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यांनी.

प्रतिनिधी : सुंदरबन महानगरपालिकेतील १९ नगरसेवक पदासाठी मतदान होत असून जनपक्षाचे उमेदवार आप्पासाहेब दिवे रिंगणात उभे असून त्यांच्या विरोधात सेवाभावी पक्षाचे उमेदवार काकासाहेब शिरोळे देखील रिंगणात उभे आहेत. अत्यंत प्रतिष्ठेची अशी लढाई आहे. आपल्या सोबत आहे प्रभाग क्र. ०४ येथील जनपक्षाचे उमेदवार अप्पासाहेब दिवे आपण त्यांनाच विचारूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे.

उमेदवार : या ठिकाणी जनपक्षाचा उमेदवार म्हणून मी नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहे. आमच्या पक्षाने आतापर्यंत जनतेच्या हिताचा विचार करत आलेला असून लोकहिताची कामे देखील केली आहे. रस्त्यांचे प्रश्न, गटारांची कामे, पाण्याचा प्रश्न, वाचनालय, गार्डन, रस्त्यांवरील दिवे, वृद्धाश्रम, तरुणांसाठी जिम, महिलांसाठी शिलाई मशीन देऊन त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करीत पक्षाने सामाजिक कामे केली आहेत. आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच नवीन अत्याधुनिक सेवासुविधा देणारं हॉस्पिटल उभारणार आहोत येथील नागरिकांना पाण्याची मोठी गैरसोय होत होती त्याकरिता नव्याने पाइपलाईन टाकून पाणी प्रश्न आम्ही सोडविला आहे. आमच्या पक्षाची कामे पाहता जनता आमच्या पाठीशी उभी आहे त्यांचा आशिर्वाद आमच्या सोबत आहे. येणाऱ्या पुढील काळात अशीच कामे करत राहू आणि जी रखडलेली कामे आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करु. आम्ही पुन्हा निवडून येऊ हा विश्वास मला आणि माझ्या पक्षाला आहे तेव्हा सर्वानी भरघोस मतांनी माझ्या पक्षाला विजयी करा जनसेवक या नात्याने मी आश्वासन देतो.

प्रतिनिधी : जो काही विकास आणि बदल करण्यासाठी उमेदवारांनी चंग बांधला आहे हा अजेंडा घेऊन पुढील कामे हे उमदेवार निवडून आल्यावर करणार आहेत. जनता नेमकं कुणाला कौल देणार आहे. कोणत्या पक्षाच्या बाजूने जनता उभी राहणार आहे हे लवकरच येणाऱ्या निकालानंतरच कळणार आहे.

मंडळी हे चित्र आहे आपण राहत असलेल्या विभागातील. मोठमोठी आश्वासने, विकासाच गाजर आणि भलीमोठी स्वप्न दाखवत हे उमदेवार तुमच्या आमच्या प्रत्येकांच्या घरोघरी नक्कीच आले असतील. निमित्त होत "निवडणूका" आणि निवडून आल्यावर काय होत हे सांगायला नको अगदी गल्लीबोळातील लहान मुलगा देखील सांगू शकेल. कोणती कामे पूर्ण झाली आणि कोणती कामे झाली नाहीत. संथ गतीने काम करणाऱ्या नगरसेवकाना का बरं आपण प्रश्न विचारत नाही आणि विचारलं तर त्याचा लवकर पाठपुरावा देखील होत नाही. या निवडणूका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडीच म्हणावी लागेल. निवडणुका जवळ आल्या कि कामाचा जोर वाढतो आणि निवडून आल्यावर हा जोर काहीसा हळूहळू कमी होत जातो जसं पौर्णिमेच्यादिवशी सागराला भरती यावी तसं. आश्वासने, मोठमोठ्या रॅली काढून कसलं आलं शक्तीप्रदर्शन, सभांसाठी नागरिकांची हि गर्दी, "अबकी बार हमारी सरकार" ! एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, कधी काळी आम रस्त्यावर न फिरकणारा पांढर पेशातला हत्ती उन्हातान्हाची पर्वा न करता घरोदारी जाऊन हात जोडून कळकळीची विनंती करू लागतो मतदान करून विजयी करा. हेच हात काही दिवसात हळूहळू कधी मागे जातात हे तुम्हांला आणि त्या नगरसेवकला देखील कळत नाही. रात्रीचा दिवस करून हे उमेदवार आणि पक्ष कार्येकर्ते सर्व शक्ती पणाला लावून काम करत असतात एखाद्या कार्यक्रमाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणावं लागेल. निवडून आल्यावर जनतेच्या पडलेल्या चेहऱ्यावरच चित्र नक्कीच बदलेल या आशेवर लोकांनी आपल्या उमेदवाराला निवडून दिल असतं अशी व्यक्ती आपली विभागप्रमुख म्हणून निवडून येते "आला नगरसेवक आपला नगरसेवक. "

गेल्या दहा एक वर्षात नगरसेवकाची व्याख्याच बदलून गेली आहे, आलिशान गाडी, राहायला सुसज्ज घर, हातात सोन्याचं ब्रेसलेट, गळ्यात सोन्याच्या माळा, डोळ्याला गॉगल एकूणच "गोल्ड मॅन" अशी ओळख निर्माण झाली. आपला नगरसेवक कसा असावा हि प्रत्येक वार्डातील, विभागातील नागरिकांच्या मनातला एक प्रश्न. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे तो लोकप्रतिनिधीची कर्तव्य काय असते याचा विसर नगरसेवकाला का होतो? कोणती कामे अपेक्षित आहे नगसेवकांकडून याचा विचारच होत नाही. प्रत्येकवेळी नगरसेवकाच्या धोरणात्मक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. नागरिकांचे प्रश्न समस्या समजून घेऊन विकासकामे करणारा असावा रस्त्यांवरील खड्डे, रुंद रस्ते, पार्कींगचा प्रश्न, खेळाची मैदाने, सार्वजनिक स्वछतागृहे, नागरिकांसाठी आरोग्याचे प्रश्न, कचऱ्याची समस्या, नाले सफाई तसेच नगरपालिका आणि सरकार झोपड्पट्टी पुनर्वसन करण्यासाठी अनेक चांगल्या योजना राबविते त्याबाबत नगरसेवकाने आपल्या विभागात त्या योजना राबविण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. नगराचा सेवक या नात्याने नगरसेवकाची काही जबाबदारी असते. निवडणुकी मध्ये भ्रष्टाचार करणार नाही, वार्षिक अहवाल सादर केला पाहिजे. राजकारण आणि गुन्हेगारी यांचं नातं आहे. नगरसेवकाची नेमणूक करताना तिकीट देताना कोणत्या निकषावर दिल जात. जनतेची कामे जर होत नसतील तर नगरपालिकेत जाऊन काय करतात. निवडणूक जवळ आल्या कि वर्षाचा माहिती तपशील पत्र लोकांसमोर मांडायचं. मिळालेल्या निधीचा कसा विनियोग केला जातो याबात स्पष्टता नाही. आपल्या अधिकाराचा वापर प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी केला पाहिजे.

राज्यघटनेने नागरिकांना काही मूलभूत हक्क आणि कर्तव्ये दिले आहेत त्यातील एक मतदानाचा अधिकार. १८ वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती मतदान करू शकते तसेच तिला आपल्या मागण्या, प्रश्न समस्या सोडविण्यासाठी एका व्यक्तीला निवडून द्यावं लागतं. भारताचा सुजाण नागरिक म्हणून मी आपलं कर्तव्य पार पाडतो का हा एक प्रश्न आहे. लोकांची कामे पूर्ण होत नसली कि जनता मतदान करत नाही उमदेवार आणि कामाची पूर्तता होत नसल्याने मतदार राजा उदासीन असतो. उदासीन म्हूणन नाही तर एक जागरूक नागरिक म्हणून परिवर्तनासाठी, लोकशाही मजबूत करण्यासाठी आपला प्रतिनिधी निवडावा लागतो. आपण ज्याला आपलं मानतो पण ती व्यक्ती आपल्याला मानतेच असं नाही. त्यासाठी जनतेने जागरूक राहून आपला प्रतिनिधी निवडावा. आणि योग्य उमेदवारला मतदान करून लोकशाही बळकट करूया. जनतेने कोणत्याही आमिषाना बळी न पडता एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे.

"यहा काम नहीं सिर्फ नाम से हि बोलता है आया नगरसेवक अपना  नगरसेवक " !






- महेश भुवड







All Rights Reserved, 2018 © Mahesh Bhuwad



  • Share:

You Might Also Like

0 comments

All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.