आली गटारी...
By MAHESH BHUWAD - July 20, 2019
आली गटारी.... !!! आता हे काय नवीन ? नवीन असं काही नाही, यंदाही सालाबादप्रमाणे... हो, तुम्ही बरोबर वाचलात. होय, आली गटारी.... पण आली दिवाळी असं आहे. ते फक्त दिवाळीत. हे गटारीसाठी, कमाल आहे बुवा ! लिहणाऱ्यांची कमाल आणि पिणाऱ्यांची धमाल. गटारी सण मोठा पिणाऱ्याला नाही तोटा. हा सर्व आटापिटा फक्त गटारीसाठी. आपल्याकडे गटारी आणि थर्टी फर्स्ट धूमधडाक्यात साजरे केले जातात. अलीकडच्या लोकांनी गटारीला सुद्धा सणामध्ये सहभागी केलय. किंबहुना आपण त्याला इव्हेंटच स्वरूप प्राप्त करून दिलयं. कोणी वैयक्तिक साजरा करतो तर कोणी मित्रपरिवारासोबत. असो, काही दिवसच शिल्लक राहिले गटारीला. एव्हाना व्हॅट्सऍप, फेसबुकवरती शुभेच्छाचे संदेश, विनोदी व्हिडीओ, स्टिकर, GIF एकमेकांना फॉरवर्ड करत वायरल होऊ लागली असतील. अनेकांनी तर आपले पार्टी मॅनेजमेंटचे प्लॅनिंग सुद्धा केलं असतील. विविध बेत आखले असतील. चिकन, मटण, दारूची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स गटारीच्या तयारीला लागली असतील. दिवाळीत आकाश कंदील, दिव्यांनी झगमगतात तसाच काहीसा प्रकार गटारीत पाहायला मिळतो. आकर्षक ऑफर्स गटारी स्पेशल. लोंकाची अक्षरशः दुकानावर झुंबड उडते. चिकन, मटण दारूची दुकाने, हॉटेल्स रेस्टॉरंट्स गर्दीने फुलून जातात. असं असताना कशाला मागे राहायचं बरं, चला तर मग आपण सुद्धा गटारी साजरी करूया या विषयाचा गटारी विशेष लेख.
पावसाळा सुरु झाला कि वारीचे वेध लागतात. माऊलीचे दर्शनानंतर एक महिन्याने श्रावण मासाला सुरुवात होते. व्रत वैकल्याचे दिवस. पण तमाम गटारी प्रेमींना वेड लागते गटारीचे. ये भाय कब है गटारी ? लोकल ट्रेन, ऑफिस अगदी कुठेही सर्रासपणे या दिवसात विचारला जाणारा हमखास प्रश्न. काय मग, गटारी स्पेशल काय ? चर्चाना उधाण येते. हा सण केवळ मराठी माणसाचा आहे असं नाही तर अनेक लोक यात सहभागी होऊन हा सण साजरा करतात. या सणाचे विशेष म्हणजे नॉनव्हेज, दारू आणि सोबत पिणारे मित्र. हल्ली शाळेत जाणाऱ्या नवीन पिढीला देखील गटारी हा सण आहे असचं वाटू लागलं आहे. आमच्या लहानपणी आम्ही शेजारच्या काकुंच्या घरी गेलो होतो. काका आणि त्यांचे मित्र खाली बसून ग्लास मध्ये दारू ओतत होते. याबद्दल त्याना विचारलं तेव्हा ते म्हणाले बाळा हे औषध आहे. आम्ही तर लगेच दोन मिनिटात घेतो तुम्ही तर सर्व एकत्र बसून घेत आहात. हे कोणत्या आजारावरच औषध आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिलं बाळा, तू अजून लहान आहेस. तुम्ही आता निघा बघू जाताना दरवाजा बंद करून जा. काही महाभाग लोक आपल्या लहान मुलाला देखील दारूचे एक दोन थेंब जिभेला लावतात पण दो बूंद जिंदगीसाठी पोलिओ बुथवर जाण्यासाठी पाय मागे सरकतात. अख्क आयुष्य दारूत गेल्याने मुलाला देखील त्याच मार्गावर घेऊन जातात. रविवार सुट्टीचा वार असल्याने बहुसंख्य लोकांचा रविवार तर अल्पसंख्यायकांचा बुधवार वा शुक्रवार. मटण, चिकन, मच्छी, दारू वर तुटून पडायचं. जरा अति झाली कि गटारात पडायचे झाली आमची गटारी साजरी. अगदी कुठेही बसून साजरा केला जाणारा सण. पिणाऱ्यांची चांगलीच चंगळ असते. बस ते कोणाच्या तरी शोधात असतात. निवांत ठिकाणी मित्रांना फोन लावत हॉटेल्समध्ये इकडंतिकडे भटकत असतात. पिणाऱ्यामित्रांमध्ये ज्याने आयुष्यात दारूला हात लावला नसतो अशा मित्राला देखील दारू पियाला ब्लॅकमेल करतात, अरे, घे रे थोडीशी. काही नाही होणारं आम्ही इतकी वर्षे पितोय ना काय झालं आम्हाला ! काही नाही, तर मग आमच्यासोबत घे थोडीशी असं करत बिचाऱ्या निर्व्यसनीला दारूचं व्यसन कधी लागत काही कळतच नाही. हा हा म्हणता शेवटी निघायची तयारी होते पण पाय मात्र निघत नसतात. टेबलावर बिल येऊन पडत. बारा हजार रुपये. बस फक्त १२ हजार. रात्रीचे उशीरा घरी आल्याने बारा वाजले असतात.
मित्रांनो प्रत्येकाने हा अनुभव घेतलाच असेल असं म्हणायला हरकत नाही. दुसऱ्यादिवशी बारा नाही तर तीनतेरा वाजले असतात. एवढं बिल ! प्रत्येकजण एकमेकांकडे डोळे मोठे करत पाहत कोण जास्त पील ? हे आपल्या समाजाचे चित्र. आपण काय करतो ? कोणते सण साजरे करतो ? ज्याला आपण सण म्हणतो खरचं तो सण आहे का ? जर तो सण मानीत असू तर सणासारखा साजरा का होत नाही ? धांगडधिंगा, दारू पिऊन तमाशा करणं. कोणी बोललं कि अरे.. जरा कमी पित जा. तुज्या बापाची पितो का ? माझ्या पैशाची पीतोना ! तुझ काय जातय. असं उद्धट उत्तर ऐकत गप्प पुढे जावं लागतं. प्रश्न खाण्यापिण्याचा नाही तर येणारी पिढीला काय आदर्श देणार आहोत. समाजातील नैतिक मूल्ये बाजूला सारून फक्त मानव, समाज अधःपतन हाच हेतू आहे का ? गटारी साजरी होतेय दारू पिऊन, गटारात, रस्त्यावर पडून. दारूच्या आहारी जाऊन. यातून कसं कुटुंब उभं राहणार आणि नवीन पिढी, समाज. कुटुंबाचा आपल्या मुलाचा यात विचार देखील नसतो. हवंय ते फक्त स्वांतत्र्य, स्वतःला आनंद . दारूने अनेक कुटुंब उध्वस्त झाली. दारू वाईटच. दारू वाईट असते हे योग्य आहे पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला कि ते विषच. कित्येकांची घरे दारुच्या उदरर्निवाहावर चालतात. श्रावणात मासांहार वर्ज्य आहे म्हणून त्याआधी हि सोय केली जाते. मनुष्याने आपल्या फायद्यांसाठी, वैयक्तीक स्वार्थासाठी नियम बनवले. मांसाहार करावा अथवा करू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न. पण दारू पिऊन धिंगाणा घालणे उलट सुलट बोलणे हे समाजात गैर आहे. सुशिक्षित चांगल्या घरची तरुण मुले दारूच्या आहारी गेली. प्रोफेशनल प्रमाणे ब्रॅण्डेड, महागडी दारू पिऊन स्वतः पिऊन इतरांनाही देशोधडीला लावले. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा एक भाग असतो. समाजाशी देणं लागतो. सामाजिक भान ठेऊन समाजात सण, पार्टी साजरे केले पाहिजे. इतरांना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. गडचिरोली, चंद्रपूर
जिल्हा दारूबंदी, व्यसनमुक्ती म्हणून घोषीत केला आहे. नवरा दारूत गेला आता मुलगा हि, कुटुंबाचा कणा तरुण दारूच्या आहारी गेला तर याच दुःखानें कुटुंब पोखरून जात. याकरिता डॉ. अभय बंग राणी बंग, पारोमिता गोस्वामी अशा समाजसुधारकांनी एकत्र येऊन दारूबंदी लढा दिला. तरुणांमध्ये जनजागृती केली.
गटारीचा आजवरचा इतिहास पाहिला कि अनेक लोक दारूत गेले असाच आहे. गटारीचा दारूशी थेट संबंध आहे. दारूशिवाय गटारी कसली. खालच्या थराची पातळी गाठली आणि आयुष्याची राखरांगोळी करून टाकली. गटारी हे नाव कुठून आलं कसं आलं हे माहित नाही. पण आषाढ अमावस्याची जागा गटारी ने घेतली हे मात्र खरं. गटार स्वच्छ करण्याऐवजी गटारात कचरा दारूच्या बाटल्या टाकून परिसर अस्वच्छ करून रोगराईला निमंत्रण देतोय.
मन मंदिरा तेजाने च्या ऐवजी मन मदिरेत चिअर्सने भरले आहे. झिंगायचं पिऊन फुल टेन्शन गुल. याला जबाबदार कोण ? पिणारे आहेतच आणि पिणाऱ्याला खतपाणी घालणारे पोशिंदे.
गटारी साजरी होते तर मग आषाढ अमावस्या का नाही ? जो भारतीय संस्कृतीमध्ये सण आहे त्याला बाजूला करून फक्त आनंदासाठी, पिण्यासाठी गटारी सण हवाय. अशाने आषाढ महिन्याचे महत्व कमी करत चाललो आहे. आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा उत्सव साजरी करतो. देवशयनी एकादशी पासून चातुर्मास सुरु होतो. देव चार महिने झोपी जातो असा समज आहे म्हणून काय पार्टी करायला रान मोकळं. त्याचा शेवट दारू पिऊन करतो. आपल्या संस्कृतीचा देदीप्यमान इतिहास सण आणि उत्सवांमध्ये आहे. प्रत्येक सणाचं महत्व समजून साजरे केली जातात. त्यामागे मोठी विचारधारा आहे. शास्त्रीय कारण आहे. प्रत्येक ऋतूंमध्ये येणारे सण उत्सव काहीतरी संदेश देण्यासाठी आलेले असतात. समाजातील निरागसता, दुःख, क्लेश, हेवेदावे बाजूला सारून जीवनाला एक नवी दिशा देतात. उत्साह, चैतन्य, स्फूर्ती देतात. ध्येय देतात. जीवन उन्नत बनवितात. आपल्याकडे अमावस्या म्हटलं कि वाईट असते असा गैरसमज आहे. अमावस्याच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून सर्वत्र लख प्रकाशीत करून टाकायचे. दिवाळीच्या दिवशी देखील अमावस्या असते त्या दिवशी काय करतो दिवाळी काय संदेश देते अंधारातून प्रकाशाकडे. हा विचार समजून घेऊन आषाढ अमावस्या साजरी करण्यासाठी कटिबद्ध होऊया.
- महेश भुवड
0 comments