जागतिक पर्यावरण दिन - पर्यावरण आहे म्हणून जीवन आहे

By MAHESH BHUWAD - June 05, 2019






आज जागतिक पर्यावरण दिन आहे. काहींना ५ जून हि तारीख "पर्यावरण दिन" म्हणून साजरा करतात हे माहित असते. याला पाठपुस्तकीज्ञान म्हणावे कि सोशल मीडियावर ट्रेण्डिंगला फॉलो करणारे नेटवर्किंग जाळे. प्रत्येक्षात पर्यावरण बाबत आपण किती जागरूक आहोत ते कळते. महाराष्ट्रात उष्णतेचा पारा ४७ डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक. जगात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेला चंद्रपूर जिल्हा (२८ मे, २०१९).  नागपूर, विदर्भ मध्ये उष्णतेची लाट पसरली. कित्येकांनी आपले प्राण गमावले. फक्त माणसे नाही तर जंगलातील प्राणी, पशु, पक्षी. या परिस्थितीला जबाबदार कोण? तर दुसरीकडे धरण क्षेत्रातील पाणी आटले. काही जिल्ह्यांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही. पाण्यासाठी भर रणरणत्या उन्हात चटके खात वणवण भटकावे लागते. पाण्याचे टँकर आले कि पुन्हा १-२ आठवडे पाणी नाही. एवढी भीषण समस्या आहे. आणि याउलट मुंबई सारख्या मेट्रोपॉलिस शहरात पाण्याची नासाडी आणि चोरी होताना दिसतेय. घरात पाण्याचे पाट वाहत असतात. पण त्याकडे कोणाचेही लक्ष्य नसते. किती बिल येणार मोजून जास्तीत जास्त १००० ते २०००. काय फरक पडतो. जोवर खिशात पैसे आहेत तोवर. फरक शहरातल्या लोकांना नाही ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यातील लोकांना पडतो. वाढते प्रदूषण, ऑफिस, मॉल, कॉर्पोरेट क्षेत्रात विजेचा पाण्याचा आणि एसीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. AC च्या वापरामुळे वातावरतील तापमान  वाढते पण AC मध्ये राहणाऱ्या लोकांना कोण सांगणार आणि कसं समजणार एसी शिवाय. मुंबई काय कोणतीच शहरे चालणार नाही पण ग्रामीण खेडेगावातील लोक कशी काय राहतात एसी शिवाय हे एकमेव आश्चर्यच म्हणावं लागेल. 

पाणी हे जीवन आहे असे म्हणतात याचा प्रत्येय घरात TMC/BMC चं पाणी नाही आले कि कळत. प्रवासात पाणी संपलं कि अहो... एक बॉटल घ्यायला हवी होती. आज पाण्यासाठी २० ते ३० रुपये मिनरल बॉटलसाठी मोजावे लागतात भविष्यात याची किंमत कितीतरी पटीने वाढेल तेव्हा खिशात पैसे असतील किंवा नसतील माहित नाही पण पाणी ? पाण्याची किंमत फक्त शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यालाच कळते. दुष्काळात जमिनीला भेगा पडल्या पाणी आटले. तोंडचे पाणी पळाले आणि माथ्यावरचा सूर्य आग ओकत आहेत अशा वेळी पावसाची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था परिस्तिथी शहरातल्या लोकांना काय कळणार. आम्ही शहरातले लोक वाट पाहत असतो पहिल्या पावसाची. पहिला पाऊस आणि कविता. मातीतला दरवळणारा सुंगध आता तो सुंगध हि सिमेंटच्या जंगलात हरवला आहे. मागे उरला फक्त नाले गटारीचा दुर्गंध. 

झाडे लावा झाडे जगवा हि  मोहीम फक्त पर्यावरण प्रेमींसाठी निर्माण झाली आहे का असं वाटू लागल आहे. पाठयपुस्तकात मार्कांसाठी. चिपको आंदोलन होऊन सुद्धा काय धडा शिकलोय आपण. दरवर्षी देशभरात  लाखो झाडांची अक्षरश: कत्तल केली जाते. शहरात मेट्रोसाठी झाडे तोडली जातात. जंगले जाळली जातात. आगी लावल्या जातात. शहरात जंगलात आग लागते तरी कशी कि कोण लावतो. आपल्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी. खाडी, नदी, समुद्रालगतची मँग्रोव्ह (खारफुटी जंगल) तर गायबच झाले आहेत. वाळू माफियांनी भूसपाट करून टाकले आहेत. वृक्ष लागवडीचा दिवस आला कि दोन चार झाडे लावली जातात. आणि त्याचा गाजावाजा होतो. झाडे तोडल्यामुळे बिचाऱ्या पक्ष्यांचा निवारा गेला. घरटी न राहिल्याने पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. शहरात चिमणी दिसेनासी झाली आहेत. कोकिळेचा आवाज डीजे डॉल्बीच्या तालावर हरवला आहे. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी हि सुस्वरें आळविती  हे फक्त संतानाच कळले पण माणसांला कधी कळणार?

प्लास्टिक जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. प्लास्टिक शिवाय जीवन नाही. प्लास्टिकला पर्यायी मार्ग कोणता ? प्लास्टिकमुळे पावसाळ्यात नदी, नाले भरून वाहतात. रेल्वे ट्रॅक लगत असलेल्या प्लास्टिकमुळे लोकल ट्रेन ठप्प होते. प्लास्टिक जाळल्यामुळे प्रदूषण वाढते हे माहित आहे पण त्यावर कारवाई नाही. या प्लास्टिकमुळे कित्येक जनावरांनी आपले प्राण गमावले आहेत. शहरात कचरापेटीच्या बाजूला असणाऱ्या गाईच्या पोटात प्लास्टिक,  बॉल,  लहान खेळणी, कमरपट्टा, शिळे अन्न, दुधाच्या पिशव्या अशा अनेक वस्तूमुळे गाईंना आपले प्राण गमवावे लागले आहे गो हत्येच पातक किती भयंकर असत ते आपण पुराणातील कथेत ऐकलं आहे मग या गाईच्या हत्येला कोण जबाबदार ? कोणाचं हे पातक आहे, आपल्याकडे हिंदूंमध्ये गाय हि प्रमुख देवता आहे गायीच्या पोटात ३३ कोटी देवता आहे अशी मान्यता आहे पण पाहिले नाही दिसले ते फक्त तब्ब्ल ३० किलो प्लास्टिकचा कचरा फक्त एका गायीच्या पोटात. आपण फेकलेला कचरा कचराकुंडीत गेला आणि तो सरळ तिथे अन्नाच्या शोधात आलेल्या थेट गायीच्या पोटात. शहरातील आपण लोक घरातील कचरा बाहेर गेला कि मोकळं होतो पण त्या जनावरांचं काय ? हा प्रश्न मागे सोडून जातो. एकीकडे गाय हि पूजनीय देवता आहे रस्तात गाय दिसली कि लगेच तिला हात लावून  नमस्कार करतो. पण खरचं हा नमस्कार तिला पोचतो का ? विचारा प्रश्न स्वतःच्या मनाला आपल्याकडे श्रद्धेच्या पलीकडे डोकं चालतच नाही. विज्ञाननिष्ठ विचारधारा नको. श्रद्धा आली कि आमची डोकी बंद पण त्यावर कोणी हल्ला केला, दूषणे लावली कि त्याला टार्गेट केले जातं, मोर्चे काढले जातात. हे फक्त भारतातच दिसणार... 

इंग्रजानी म्हटलं होत भारतातील लोक रानटी आहेत. धर्मामध्येच अडकले आहेत. त्याना आपला धर्म सुद्धा नक्की कोणता आहे हे माहित नाही. फक्त पोथी पुराण, मंदिरे इथेच देव दिसेल. बाहेर आलो कि देव नाही. पुराणातील वांगी पुराणात. कधी आमचे ग्रहण सुटणार देव जाणे.... 

असो...  पर्यावरण  दिवशी तो दिवस ती तारीख लक्षात राहते पण विचार केला कि रोजच पर्यावरण दिवस आहे. एक झाड अनेकांना सावली देत पण स्वतः मात्र ऊन, वारा पाऊस घेत उभं असतं. परोपकारीता किती मोठा गुण आहे ते झाडांकडून शिकावं आणि माणसाने झाडे लावत त्याची काळजी घेत कृतज्ञ राहत शिकावं. 




 - महेश भुवड 




  • Share:

You Might Also Like

0 comments

All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.