सुंदर मी होणार...
By MAHESH BHUWAD - May 14, 2019
wow ! so beautiful, आता तरुण मी दिसणारं
ना पिअर्स, दव, ना संतूर सोपं ,चेहरा माझा अधिक खुळणार
ना हळद ना चंदनाचे गुण त्वचा आणखी उजळणार
सौंदर्यात भर टाकणारी शस्त्रक्रिया मी करणार
अनेकांच्या नजरा माझ्यावर खिळणार
सुंदर मी होणार, सुंदर मी दिसणारं....
मी सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. चार चौघात उठून दिसावं. लग्न, समारंभ, पार्टी, सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात आपली मोहर उठावी या करिता किती खटाटोप. तारुण्य किती मादक असतं याची कल्पना न केलेली बरी. भले भले लोक आपण सुंदर दिसावं याकरिता किती काय उपाय करतात शक्कल काढतात. फेअर्स क्रीम पासून साबण आणि आता तर शस्त्रक्रिया. एवढा सारा हट्टाहास फक्त सुंदर दिसण्यासाठी. काय बोलणार ! त्यात टीव्ही जाहिरातींची सौंदर्यात भर. वाढते प्रदूषण, धूळ, उष्णता यापासून संरक्षण व्हावं ठीक आहे पण त्वचा गोरी सुंदर दिसण्यासाठी जाहिरातींना बळी पडायचं ? खरचं साबण, स्किन क्रीम लावले आणि त्वचा गोरी बनत असेल तर आजवर भर कडक उन्हात काम करणारे लोक सुद्धा क्रीम लावून साबणाने अंघोळ करून तजेलदार दिसले असते. हे झालं सुंदर दिसण्यासाठी पण लहान मुलांसाठी बेबी पार्लर ! बदाम, मलाई दूध, केशर, चंदन, हळद, एलोवेरा, कडुलिंब याचं महत्व सांगून ब्युटीपार्लर, महागडे सलुनची दुकाने थाटली. पण सुंदर काय झाले नाही आता शेवटचा उपाय शस्त्रक्रिया.
जाहिरातींचं युग असल्याने अनेक जण जाहिरातींच्या आमिषाला बळी पडतात. सौंदर्यप्रसाधनाची जाहिरात करून जाहिरात कंपनीने मोठी माया गोळा केली त्यात सेलिब्रिटी सुद्धा काही कमी नाही. पण बळी गेला तो सर्वसामान्य माणूस. फास टाकावे तसे सौंदर्यसाधनेत तरुण-तरुणी अक्षरशः वाहून गेले. शस्त्रक्रियेच्या आहारी गेले. वयस्कर व्यक्ती वयाची चाळीशी उलटलेल्यांची सुद्धा कमी नाही. लग्नसराई, सुंदर दिसण्याच्या स्पर्धेत मी मागे पडलो तर या भीतीने किंवा जोडीदाराचा विश्वास, प्रेम संपादन करण्यासाठी, त्याच्या नजरेत आपण कमी पडून आपला जोडीदार हातातून गेला तर.. या बुरसटलेल्या समाजात आम्ही किती मॉडर्न आहोत हे सिद्ध करण्यासाठी तरुण तरुणी आणि वयस्कर मंडळी सौंदर्यप्रसाधनासाठी नाहक बळी पडत आहे.
ठेविले अनंते तैसेचि रहावे. माणूस जन्माला येतो तो सुंदर दिसण्यासाठी नाही तर सुंदर होण्यासाठी. सौंदर्याने नाही ते उत्तम गुणांनी, स्वभावाने आणि विचाराने. सौंदर्य दिसण्यात नसतं असतं ते फक्त असण्यात. तुम्ही जसे आहेत अगदी तसेच. आपल्या व्यक्तिमत्वावरून ठरते सौंदर्याचा सुंदरतेशी काही एक संबंध नाही. फॅशनच्या दुनियेत नैसर्गिक सौंदर्य हरवलंय उरलंय फक्त रंगरंगोटीचा मेकअप. व्यक्तिमत्वाला साजेस आकर्षक दिसण्यासाठी खुलून उठण्यासाठी हेअर डाईज, शाम्पू, साबण, सुगंधी तेल, परफ्युम, वगैरे सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारात सुंदरतेची व्याख्याच बदलून टाकली आहे. सौंदर्याचे मार्केट ब्रँडच झाले. . आपल्याकडे गोऱ्या रंगाचं आकर्षण अधिक. इंग्रज गोरे होते इंग्रज भारत सोडून जवळजवळ ७० वर्षे अधिक झाली. गोऱ्या सरकारचं राज्य गेलं पण गोऱ्यांचं वेड काही गेलं नाही. भगवान श्रीकृष्ण सुद्धा सावळे (कृष्ण धवल) होते पाच हजार वर्षांनंतरही त्याचं प्रेम आणि तो श्याम रंग लोकांच्या ह्रदयात जिवंत आहे.
गोऱ्या रंगाला इतकं महत्व का दिल जातंय? काही कळतं नाही. महागड्या ट्रीटमेंटचा वापर सुंदरता खुलण्यासाठी, हे झालं बाह्य सुंदरतेच पण आंतरिक सौंदर्याचं काय ते कधी खुळणार, कधी समोर येणार ? उणीव आहे फक्त गोरपणाच्या दिसण्यात असं जर वाटू लागल कि सुंदरता आपणच नष्ट करू पाहत आहोत. सुंदरता हि एक कला आहे. कोणाकडे आहे तर कोणाकडे नाही. पण त्याचा गर्व अभिमान असू नये. सुंदरता नसली म्हणून काय बिघडलंय पण जीवन तर चालूच आहे. श्वास घेतोय आहे ना मग घोडे कुठे अडलंय ? सुंदर दिसण्यासाठी काय उपाय करतील कोण जाणे मायकल जॅक्सनने सुद्धा आपला चेहऱ्याचा रंग बदलून घेतला. सुपरलेटिव्ह कॉम्प्लेक्स आणि इन्फेरेटिव्ह कॉम्प्लेक्सची दरी दिवसेंदिवस वाढतच आहे. लग्नाच्या बाजारात हल्ली विचारूच नका मुलगा अथवा मुलगी गोरी पाहिजे म्हणून कितीतरी स्थळं नाकारली जातात. टीव्ही जाहिरातींच्या आमिषांना बळी न पडता रंगाच्या मोहात न बुडता आंतरिक गुणांना आणि स्वभावाला प्राधान्य दिलं पाहिजे. पैसे आणि प्रसिद्धीसाठी लोक काय काय करतील पण काळेपणाचा न्यूनगंड कमी करण्यात प्रयत्न होतील का ? अलीकडेच मल्याळम अभिनेत्री आणि उत्तम डान्सर असलेली साई पल्लवी ने २ कोटीची जाहिरात नाकारली ती म्हणते मी कधीच सौंदर्यप्रसाधनाची जाहिरात करत नाही आणि पैशासाठी तर मुळीच नाही. तिला मेकअप करून आपले खरे सौंदर्य लपवण्यात गरज वाटत नाही. साई पल्लवी ने एक नवा आदर्श आजच्या तरुण तरुणी पिढीसमोर ठेवला आहे.
अन्न वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा आहेत. तारुण्य आणि सौंदर्य प्रत्येकाला हवंहवंस वाटतं तसेच सुंदर दिसणे हि सुद्धा एक गरज बनली किंबहुना ती एक भूक बनली आहे. हे विसरता कामा नये कि राजा ययाती ने सुद्धा आपल्या मुलाकडे आयुष्य मागून घेतले आहे. वासनेच्या आहारी गेलेल्या माणसाला केवळ सुंदरताच दिसते ती त्याला भोगाकडे विकारांकडे घेऊन जाते. केवळ सौंदर्याचा उपभोग न घेता सौंदर्याची उपासना पूजा देखील करता आली पाहिजे ती एक कला आहे साधना आहे. नैतिक सामाजिक मूल्ये आणि वास्तविक समाज भान ठेऊन सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. समाजातील काळा गोरा विषमतेची दरी मिटवली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध झालं पाहिजे.
हा लेखाचा उद्देश समाजात प्रबोधन व्हावं, जनजागृती व्हावी हाच आहे.
हा लेखाचा उद्देश समाजात प्रबोधन व्हावं, जनजागृती व्हावी हाच आहे.
- महेश भुवड
0 comments