हल्ली वाचायला वेळच मिळत नाही ! मोबाईल हातात आल्याने पुस्तकाची जागा मोबाईलने घेतली. ई-बुक जमान्यात हातात पुस्तक घेऊन वांचण्यातला आनंद, सोबत हाताचं बोट तोंडाकडे नेत जिभेला लावीत पुस्तकाचं पान उलटण्यातील मज्जा काही औरच होती. आज तो आनंद गेला आणि सोबत हातातील पुस्तक हि गेलं. "वाचालं तर वाचाल" तसा नेहमी विचारला जाणारा मराठी निबंध विषय आहे. एकवेळ आपण पुस्तक वाचत असू पण दुसऱ्याला वाचण्याची आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने वापरली जाणारी म्हण.
पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. एका लेखकाचं वाक्य आठवतं - "पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि सुधारलेल मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही. " या प्रेरणेतून ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय गेली १२५ वर्ष उभं आहे केवळ वास्तू म्हणून नाही तर ज्ञानाची गंगा बनून. माणसाला दोन गोष्टी नेहमीच शिकवतात १. वाचलेली पुस्तके आणि दुसरं भेटलेली माणसं. निमित्त होत पुस्तक प्रकाशन सोहळा. "जयोस्तुते" वीर सावरकरांच्या निवडक कवितांचा भावानुवाद लेखिका सौ. साधना योगेश जोशी आणि या समारंभाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुनबाई श्रीमती सुंदरबाई सावरकर यांनी तात्याराव सावरकांच्या काही दुर्मिळ आठवणी जागवताना.
मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळयाचे उद्घाटक ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. हरिकांत भानुशाली होते. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष श्री विद्याधर वालावलकर, व्यास क्रिएशन पुस्तक प्रकाशन संस्थेचे संचालक निलेश गायकवाड, जेष्ठ पत्रकार श्री नेर्लेकर गुरुजी, ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर सर, आमदार संजयजी केळकर, दूरदर्शनच्या माजी वृत्तनिवेदिका श्रीमती वासंती वर्तक, स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्या सुनबाई श्रीमती सुंदरबाई सावरकर, डॉ. बेडेकर विद्यालयाच्या शिक्षिका, लेखिका सौ. साधना जोशी, खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण उपस्थित होते.
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि व्यास क्रिएशन पुस्तक प्रकाशन संस्था यांच्या संयुक्त विध्यमाने " पुस्तक आदान-प्रदान महोत्सव" या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष होते. मराठी ग्रंथ संग्रहालयाला १२५ वर्षे पूर्ण झाली असून आजवर या मराठी ग्रंथ संग्रहालयाने वाचकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. डिजिटायझेशनच्या जमान्यात पुस्तक संग्रहालयाने कात टाकली आहे. ई-बुक, साहित्य मोबाईल अँप, संपूर्ण पुस्तक ऑनलाईन मराठीत पीडीएफ फाईल मध्ये वाचकांना उपलब्ध करणे, घरपोच सेवा अशा विविध माध्यमातून संग्रहालय वाचकांपर्यंत पोहोचत आहे. पुस्तक आदान-प्रदान म्हणजे काय ? याविषयी अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. वाचकाने आपली जुनी पुस्तके जमा करणे आणि त्या बदल्यात नवीन पुस्तक घेणे. नवीन पुस्तक विकत घेणे. पूर्वीची वस्तुविनिमय (बार्टर सिस्टम) पध्दत. याविषयी मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष श्री विद्याधर वालावलकर यांनी बोलतांना सांगितले.
पुस्तक प्रकाशन संस्थेमध्ये अग्रगण्य असलेली व्यास क्रिएशन हि प्रमुख संस्था आहे या संस्थेने आजवर ५०० हुन अधिक पुस्तके प्रकाशन केली आहेत. यात कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, ललित लेखन, अनुवादित. ऐतिहासिक, संत साहित्य, बालवाचकांसाठी बालसंग्रह आहे याविषयी बोलताना व्यास क्रिएशन पुस्तक प्रकाशन संस्थेचे संचालक निलेश गायकवाड यांनी आपलं मत व्यक्त केलं.
ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर सरानी आपलं मनोगत व्यक्त केलं. २००९ च्या आयएसएस बॅचचे अधिकारी होते. रायगड आणि रत्नागिरी जिल्यात त्यांनी काम केलं आहे. एमए. पर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पीएचडीचा अभ्यास चालू ठेवला. पुढे ते सरकारी खात्यात रुजू झाले. मात्र वाचनाची आवड अजूनही कायम आहे असं त्यांनी सांगितले. अभ्यासक्रमात विविध लेखकांची पुस्तके, साहित्य, कादंबरी, कवितासंग्रह वाचला आहे. पु.ल. देशपांडे यांची पुस्तके प्रवासात वाचताना सोबत असतात. पु ल. विषयी त्यांना खूप आवड आहे.
ठाण्याचे लोकप्रिय आमदार, सांस्कृतिक मंत्री संजयजी केळकर यांनी वेळोवेळी पुस्तक संस्थांना, शाळा, कॉलेजना मदत करत आलेले आहे. ठाण्यातील गरजूना ते भरभरून मदत करत असतात. काही वेळेस संस्था जाण्याच्या आधीच ते तिथे जाऊन पोचतात. वेळ मिळेल तसं वाचत असतो. घर आणि ऑफिस मध्ये स्वतःची पुस्तक लायब्ररी सुद्धा आहे. माझ्याकडची जुनी पुस्तके मी देऊ शकत नाहीत कारण ती माझी आहेत. आणि जी पुस्तके वाचली नाहीत ती सुद्धा मी देऊ शकत नाहीत कारण ती वाचायची आहेत एकवेळ मी नवीन पुस्तके विकत घेईल पण जुनी पुस्तके देऊ शकत नाही त्यानी त्या पुस्तकावर प्रेम केलं आहे असं मत संजयजी यांनी व्यक्त केलं.
ठाण्यात गेली ३८ वर्षे वैद्यकीय सेवा प्रदान करणारे ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. हरिकांत भानुशालीची ओळख आहे. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा डॉ. बी. सी. रॉय या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. केवळ कुशल वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून नाही तर ते दानशूर म्हणूनही त्यांची ओळख आहे. ठाण्यातल्या खेड्यापाड्यात आदिवासी पाड्यात गरिबांसाठी सामाजिक काम केलं आहे. या कार्यक्रमाचे ते प्रमुख उदघाटक म्हणून त्यांची उपस्थिती लाभली. असं मत त्यानी व्यक्त केलं
स्वांतत्र्यवीर सावरकारांविषयी आपल्याला माहितच आहे. स्वांतत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, हिंदुसंघटक, प्रखर हिंदुत्ववादी, राजकारणी, विज्ञाननिष्ठ तसेच प्रतिभावंत कवी, गझलकार देखील होते. कवितांसोबत त्यांचे पोवाडे देखील प्रचंड लोकप्रिय आहे. " सागरा प्राण तळमळला " जयोस्तुते, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा या व्यतिरिक्त अन्य कविता देखील आहे. कित्येकाना सावरकर अजूनही समजले नाहीत. ते विध्यार्थी असो वा शिक्षक. साधना मॅडमनी सावरकरांच्या निवडक कविता संग्रहित करून त्यांचा भावानुवाद " जयोस्तुते " या पुस्तकात मांडला आहे. सावरकारांविषयी बोलताना त्यांचे सावकारांविषयी असलेली ओढ, प्रेम आणि सावरकरांविषयीचा गाढा अभ्यास त्यांच्या बोलण्याच्या शैलीतून दिसून येत होता .
कार्यक्रमामध्ये सौ. साधना मॅडमनी श्रीमती सुंदरबाई यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारीत तात्याराव सावरकरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रश्नोत्तरी च्या कार्यक्रमात सावरकरांच्या अंदमानातील काही जुन्या आठवणी ताज्या केल्या. मंगेशकर घराणे आणि सावरकर यांचे सलोख्याचे संबंध होते. लता दीदीच घरी येणं गप्पा मारत तर कधी मटण घेऊन येत असतं. तात्यारावांच्या अंदमानातील जुन्या आठवणी त्यावेळची परिस्तिथी ऐकताना अंगावर काटा उभा राहत होता. सावरकरांच्या कुटुंबातील सदस्यांना पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. सावरकर नाव ऐकताच अंगात बळ संचारत उत्साह येतो. काम करण्याची प्रेरणा मिळते.
कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात हि त्या सूत्रसंचालनाने होते या कार्यक्रमाला श्री राजेंद्र पाटणकर सरांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. आपल्या कौशल्याने कार्यक्रमाची धुरा सांभाळीत ओजस वाणीने, आवाजाने आणि शब्दांनी उपस्थित श्रोत्यानां कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्यापासून ते कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत मंत्रमुग्ध केलं.
कार्यक्रमात कश्मिरा रायकर यांनी आपल्या सुरेल आवाजांनी सावरकरांच्या कविता सादर केल्या. सागरा प्राण तळमळला. या गाण्याच्या वेळी अनेकांच्या तोंडी सावरकरांच्या कवितेचे बोल नकळत बाहेर पडत होते. आणि शेवटी पुन्हा एकदा आपल्या सुरेल आवाजाने जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे। स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे ।। या गीताने "जयोस्तुते" कार्यक्रमाची सांगता केली.
- महेश भुवड